6 वर्षाच्या विद्यार्थिनीवर 14 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सहा वर्ष वयाच्या विद्यार्थिनीवर चौदा वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केला. पाथर्डी तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरुध्द पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पीडित बालिका इयत्ता पहिलीत शिक्षण घेत आहे. घरी कोणी नसल्याचे पाहून त्या मुलीला शेतात नेले. तेथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षाच्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीचे आई व वडिल हे दोघेही मंगळवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. ते सायंकाळी घरी आल्यानंतर मुलीच्या अंगातून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बुधवारी सकाळी पालकांनी मुलीला एक खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. खासगी डॉक्टरने सरकारी रुग्णालयात जावून उपचार करण्यास सांगितले. त्यानंतर आई-वडिल मुलीला घेऊन पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी या बालिकेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात 14 वर्षाच्या मुलाविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.