साताऱ्यात अपहरण करून बालिकेचा विनयभंग

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानातून घराकडे परत असणाऱ्या बालिकेस चाकूचा धाक दाखवून तीचे अपहरण करुन विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कोडोली येथील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या सनी राजेंद्र अवघडे (वय २0) या युवकाला बुधवारी रात्री अटक केली.

सातारा एमआयडीसीत असणाऱ्या एका कॉलनीत १४ वर्षीय बालिका कुटुंबियांसमवेत राहण्यास आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास ती घराजवळ असणाऱ्या एका दुकानात पेन्सिल आणण्यासाठी गेली होती. दुकानातून परत असतानाच सनी अवघडेने दुचाकी आडवी मारुन बालिकेस थांबवले. यानंतर अवघडेने बलिकेचा हात पकडून माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला गाडीवर फिरवून आणतो, असे म्हणाला. यावर तू वारंवार मला त्रास देतोस, मला तुझ्याबरोबर यायचे नाही, असे त्या बालिकेने अवघडेला सुनावले. यामुळे संतापलेल्या अवघडेने खिशात असणारा चाकू बाहेर काढत त्या बालिकेस धमकावण्यास सुरुवात केली.

चाकू गळ्याला लावत तू गाडीवर बसून आली नाहीस तर तुला मारुन टाकेन, अशी धमकी अवघडेने दिल्याने ती बालिका घाबरली व दुचाकीवर बसली. यानंतर अवघडेने दुचाकी जानाईमळाई डोंगराच्या पायथा परिसरात नेत त्या बालिकेशी अश्लील चाळे केले. थोड्या वेळानंतर अवघडेने त्या बालिकेला पुन्हा घराजवळ आणून सोडले. घरी येवून त्या बालिकेने घडल्याप्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली. याची तक्रार त्या बालिकेने रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली. यानुसार पोलिसांनी सनी अवघडेला अटक केली असून तपास हवालदार प्रकाश शेवाळे करीत आहेत.