मिरज : दोन हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

जमीनीची फेरफार रजिस्टरला नोंद घालून उतारा देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या कवलापूरचा मंडल अधिकारी आणि लाच स्विकारणाऱ्या सेवानिवृत्त तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई आज (शनिवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास मिरज शहरातील महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ करण्यात आली. सत्याने वागा अशी शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्याच पुतळ्याजवळ लाचखोरांना अटक केल्याने या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bdbbe39-ae01-11e8-80e7-b741992d8922′]

मंडल अधिकारी सुनिल बाबूराव पाटील (वय-४८) आणि सेवानिवृत्त तलाठी आप्पासाहेब भूपाल चौगुले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार यांची सोनी गावच्या हद्दीमध्ये शेत जमीन आहे. या जमीनीचा दिवाणी दावा चालू होता. या जमीनीच्या हिश्याबाबत न्यायालयाने हुकूमनामा दिला आहे. त्याप्रमाणे जमीनीची फेरफार रजिस्टरला नोंद घालून उतारा देण्यासाठी पाटील याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीमध्ये दोन हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने मान्य करुन याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a956d375-ae01-11e8-83bc-3f561b2f681c’]

लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार पाटील याच्या कवलापूर कार्यालयात गेले असता ते मिटींगला गेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच ही रक्कम सेवानिवृत्त तलाठी चौगुले यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले. लाचेची रक्कम स्विकारण्यासाठी चौगुले याने तक्रारदाला घेऊन शहरातील महात्मा गांधी चौकात घेऊन गेला. चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना चौगुले याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर लाचेची मागणी करणारा सुनिल पाटील या मंडल अधिकाऱ्याला मिरज शहरातील बालगंधर्व नाट्य मंदिरातून अटक करण्यात आली. या दोघांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी