मिरज : चोरीच्या बुलेटची खरेदी-विक्री करणारी टोळी जेरबंद

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन

नव्या कोऱ्या बुलेट चोरुन त्यांची विक्री करणाऱ्या आणि चोरीच्या बुलेट खरेदी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला अटक करण्यात आली. या टोळीकडून पोलिसांनी पाच नव्या बुलेट जप्त केल्या आहेत. ही कारवाई शहर गुन्हे प्रकटिकरणचे प्रमुख अभिजीत सावंत यांच्या टीमने केली असल्याचे उपअधीक्षक धीरज पाटील व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.१३) माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात नव्या बुलेटही चोरीस जात होत्या. त्यामुळे अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे प्रमुख उपनिरीक्षक अभिजीत सावंत व त्यांच्या टिमने रोहित बाबासाहेब धेंडे (वय 20, रा. एरंडोली), प्रविण राजाराम कांबळे (वय 30, रा. सलगरे), प्रशांत महादेव हारगे (वय 32, रा. सलगरे) या तिघांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता. रोहित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मिरजेतील नव्या पाच बुलेट चोरी केल्याची कबुली दिली. त्या सर्व बुलेट त्यांनी एका टोळीला पन्नास हजार रूपयांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार अतुल आप्पासाहेब कुंडले (वय 23, रा. सलगरे), विठ्ठल मल्लाप्पा खोत (वय 24, रा. चाबुकस्वारवाडी), प्रविण उत्तम कांबळे (वय 22, रा. मसुरगुप्पी, ता. अथणी. जि. बेळगाव), सतीश गजानन पाटील (रा. ज्योतिलिंग कॉलनी, पाचगाव रोड, कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच बुलेट जप्त करण्यात आल्या. त्यांनी प्रत्येक बुलेट पन्नास हजार रूपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्या सर्वांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c028c36-86bc-11e8-9f7a-91fee39b171e’]

आज त्यांना मिरज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांचे आणखी कोण साथिदार आहेत ? आणखी दुचाकी त्यांनी कोणाला विकल्या आहेत ? याचा शोध सुरू आहे.

दोन महिन्यात 35 दुचाकी जप्त

शहरात दुचाकी चोरच्या प्रमाणात वाढ झाल्याने हे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी जुन व जुलै या दोन महिन्यात एकूण 35 दुचाकी जप्त केल्या आहेत.