Pune News : बेपत्ता तरुणाचे गुढ उकललं, दारुसाठी पैसे मागितले म्हणून केला खून

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्नर तालुक्यातील शिवली येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गणपत काशीनाथ आढारी (वय-37 रा. शिवली) असे खून झालेल्या आदिवासी तरुणाचे नाव आहे. गणपत मित्रांकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. यावरुन झालेल्या वादातून मित्रांनीच त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या दोन मित्रांनी कंबरेच्या पट्ट्याने गळा आवळून गणपतचा खून केला.

गणपतचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह एका चारचाकी गाडीत घालून आदिवासी भागातील दुर्गम असलेल्य हतविज येथील खोल दरीत फेकून दिला, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. हा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गणेश धर्मा मुठे (वय-32), दीपक गेनभाऊ कोरडे (वय-19), अमोल विठ्ठल लांडे (वय-21 तिघे रा. माणकेश्वर, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत हा 9 फेब्रुवारी (मंगळवार) पासून बेपत्ता होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यत करण्यात आली होती. गणपत आणि आरोपी जुन्नरमधील एका वाईन शॉप जवळ गप्पा मारत होते. त्यावेळी गणपतने दारु पिण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आपटाळे खिंडीजवळ एका शेतात गप्पा मारत असताना त्याने हा वाद पुन्हा उकरुन काढला. यातुन गणेश आणि दिपक याने कंबरेच्या पट्ट्याने गणपतचा गळा आवळून खून केला. त्यानंतर बुधवारी (दि.10) अमोल लांडेच्या चारचाकी गाडीतून मृतदेह हतविज येथे नेऊन दरीत फेकून दिला. पोलीस बेपत्ता गणपतचा शोध घेत असताना रविवारी (दि.14) खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.