‘पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम देऊ नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना लक्ष्य केले आहे. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे चित्रपट सिनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी हा इशारा दिला.

“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय म्युझिक कंपन्या अजूनही पाकिस्तानी गायकांचे म्युझिक अल्बम बनवत आहेत. ही गाणी पाकिस्तानात रेकॉर्ड करुन भारतात पाठवली जात आहेत. या गोष्टी थांबवायला हव्यात. जर ही थेरं थांबली नाहीत, तर मनसे स्टाईलने धडा शिकवू” असा सज्जड दम अमेय खोपकर यांनी दिली.

मनसेने नेहमीच पाकिस्तानी कलाकार, गायक, संगीतकार, खेळाडूंना विरोध केला आहे. पाकिस्तानी दहशतवादी भारतावर सातत्याने हल्ला करुन आपल्या जवानांना मारतात, मग पाकिस्तानला भारतात थारा का द्यायचा? असा प्रश्न मनसेने सातत्याने उपस्थित करत केला आहे. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध भारताने तोडायला हवे, मग ते राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो, सर्व संबंध तोडा अशी मागणी मनसेची आहे. त्यातच पुलवामामध्ये काल झालेल्या हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना कामे देणाऱ्या भारतीय कंपन्यांना आज कडक इशारा दिला आहे.