राज साहेबांचा कार्यकर्त्यांशी ‘मनसे’ संवाद ; पण, ‘मोबाईल बंदी’ आणि ‘करडी नजर’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला प्रारंभ झाला असून तीन दिवसांच्या या दौऱ्यात राज ठाकरे हे शाखाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत मात्र या संवादादरम्यान ‘मोबाईल बंदी ‘चा फतवा काढला आहे. तसेच प्रत्येकावर ‘ करडी नजर ‘ ठेवण्यात येणार आहे.प्रसारमाध्यमांना कुठली बातमी मिळू नये याचीही खबरदारी घेण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात ए लाव रे तो व्हिडीओ द्वारे राज्यभर रान पेटवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा आघाडीला झालाच नाही उलट भाजप आणि सेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.

तर यामध्ये मनसे देखील मागे नसून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील अशोकनगर येथे तीन दिवसीय शहरातील विधानसभा मतदारसंघ निहाय अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बैठकीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. आगामी सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यांमध्ये राज ठाकरे शाखाध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीला येणार्‍या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा मोबाईल फोन गेटवर जमा करण्यात येत आहे.बैठकीमधील कोणत्याही प्रकारची माहिती प्रसारमाध्यमांना मिळता कामा नये.

या पार्श्‍वभूमीवर थेट राज ठाकरे यांच्याकडून आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यानंतर राज ठाकरे ठाणे, नाशिक, पालघर, मुंबईमधील परिस्थितीचाही आढावा घेणार आहे. विधानसभेच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक समोर येईल.