मनसेकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊतांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळातील भरमसाठ वीज बिलाबाबत यापूर्वी मनसेने पोस्टकार्ड आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेत मनसे आक्रमक झाली आहे. वाढीव वीज बिलात नगरिकांना सवलत देण्याच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व बेस्ट महाव्यवस्थापक यांच्यावर आर्थिक फसवणुकीची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीपार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन दिले आहे. लॉकडाऊन काळात टाळेबंदी असताना महावितरण कडून वीज मीटर रीडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले नाही. या काळात ग्राहकांना वीज वापरांपेक्षा अतिरिक्त जादा बिल बेस्टकडून पाठविण्यात आले होते. याबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत वीज बिलाबाबत चर्चा केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे वाढीव बिलाबाबत तक्रारी मांडल्या होत्या. तसेच बैठक घेतली होती, या बैठकीत वीज बिलात कपात करून नागरिकांची दिवाळी गोड करू असे आश्वासन दिले होते, असे किल्लेदार यांनी सांगितले. सातत्याने पाठपुरावा करूनही ऊर्जा मंत्र्यांनी घुमजाव करत बिलात सवलत न देता मीटर रीडिंग नुसार बिल भरावेच लागेल असे सांगितले. त्यामुळे नागरिकांची एकप्रकारे आर्थिक फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.