मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होणार ! भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, नेतृत्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहे. परंतु गेल्या वर्षापासून अधिक काळ देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन न करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. केंद्र सरकार सात वर्षे पूर्ण करणार असल्याच्या निमित्ताने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करु नका. कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कार्यक्रम नक्की हाती घ्या, अशा सूचना जे.पी. नड्डा यांनी दिल्या आहेत.

कोरोना संकटाने अनेक आव्हाने निर्माण केली

कोरोना संकटाच्या कठीण काळात जनतेचं दु:ख कमी करण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचं रक्षण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भाजपच्या कोट्यावधी कार्यकर्त्यांकडून तुमच्या आणि तुमच्या राज्यातील सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. या जागतिक महामारीनं आपल्या देशासमोर अनेक आव्हानं निर्माण केली आहेत. या संकटाचा सामना सध्या आपला देश करत आहे, असे नड्डा यांनी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

कोरोना संकटामुळे अनेक घाव झेलावे लागले

नड्डा यांनी पत्रात पुढे म्हटले, गेल्या शतकभरात जागाने असं भयंकर संकट पाहिलेलं नाही. भारतच नाही, तर संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. शंभर वर्षानंतर आलेल्या या भीषण संकटानं आपल्या अनेक जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून कायमचं दूर नेलं. आपल्या देशाला आणि समाजाला या संकटामुळे अनेक घाव झेलावे लागले. त्याच्या जखमा अद्याप कायम आहेत, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

मुलांच्या पाठीशी राहणे ही आपली जबाबदारी

कोरोना संकटामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. अनेकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमावले. काही मुलांचे आई वडील कोरोनाने हिरावून घेतले. अशा मुलांवर दु:खाचा किती मोठा डोंगर कोसळला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. या मुलांच्या भविष्याची चिंता करणं आणि त्यासाठी ठोस पावलं उचलणं ही आपली जबाबदारी आहे. या मुलांच्या पाठीशी उभं राहणं आणि त्यांना सांभाळणं हे आपले सामाजिक कर्तव्यदेखील आहे. अशा मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी असलेल्या योजनांची माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल, अशा शब्दात जे.पी. नड्डा यांनी आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.