लातूरच्या शेतकर्‍याचा पंतप्रधानांशी संवाद, म्हणाला – ‘मोदीजी…मेरे पास 9 गाय और 13 भैंसें हैं’

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने देशातील जनतेशी संवाद साधत असतात. काही योजनांसंदर्भात निवडक व्यक्तीशी चर्चाही करतात. मग ते विद्यार्थीही असो. नुकतेच शुक्रवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील निवडक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यात लातूर जिल्ह्यातील मातोळा (ता. औसा) येथील शेतकरी गणेश राजेंद्र भोसले यांचाही समावेश होता. त्यांना पंतप्रधानांनी शेतीशिवाय आणखी काय करता, असा सवाल केला. त्या वेळी शेतकऱ्याने सांगितले की, मेरे पास ९ गाय और १३ भैंसें हैं. असे उत्तर देताच पंतप्रधानांनी अधिक मनमोकळा संवाद केला.

लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइनद्वारे थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी मातोळ्याचे शेतकरी गणेश भोसले यांचा हा संवाद झाला. पंतप्रधानांनी ‘नमस्ते गणेशजी’, असे म्हणत संवादाला सुरुवात केली. त्या वेळी गणेश यांनी नमस्तेचे उत्तर ‘राम राम’ करून दिले. तेव्हा मोदीही ‘राम राम’ म्हणाले. मोदींनी तुमच्याजवळ किती जमीन आहे? पूर्वी काय करीत होतात? शेतीशिवाय आणखी काही करता का? असे प्रश्न विचारले. त्यावर भोसले म्हणाले, जमीन ३ हेक्टर आहे. त्यावर सोयाबीन आणि तूर पीक घेतले आहे.

पूर्वीपासून शेतीच करतो. तसेच शेतीबरोबर माझ्याकडे ९ गायी आणि १३ म्हशी आहेत. ज्याद्वारे मिळालेले पैसे शेतीत लावतो. त्यावर पंतप्रधानांनी विचारले की, कमाई शेतीमध्ये होते की पशुपालनात? त्यावर भोसले यांनी पशुपालन शेतीला पूरक असल्याचे सांगितले. पंतप्रधान पीक विम्याचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. अडीच हजार विमा भरला होता. त्याचे ५४ हजार ३१५ रुपये मिळाल्याबद्दलही भोसले यांनी समाधान व्यक्त केले.