पालकमंत्र्यांच्या तालुक्यात कलाकेंद्राविरोधात उपोषण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामस्थांचा विरोध असतानाही जिल्हा प्रशासनाने मोहा गावच्या हद्दीत कलाकेंद्रांना परवानगी दिली आहे. त्यामुळे संतापलेल्या मोहा व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच कालपासून उपोषण सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच उपोषण सुरू असताना सलग दोन दिवस प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा विषय चांगलेच चर्चेचा ठरू लागला आहे.

जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत व हापटेवाडी, रेडेवाडी, नाणेवाडी, मोहा या परिसरातील ग्रामस्थांचा कलाकेंद्रांना कडाडून विरोध होता. ग्रामस्थांनी यासाठी वेळोवेळी बंद, रास्तो रोको आंदोलन केले होते. तरीही जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून नुकतीच मोहा गावातील कलाकेंद्रांना परवानगी दिली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यात तालुक्यातील ही गावे आहेत. ग्रामस्थ आक्रमक असताना प्रशासनानेे त्यांना परवानगी दिल्यानेेे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ मोहा व परिसरातील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

परवानगी देण्याच्या काही दिवस अगोदर अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सदर कलाकेंद्राची परवानगी रद्द केली होती. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात ही कला केंद्रे होती. काही कला.केंद्राचे मालक हे मंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातूनच त्यांनी जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून कला केंद्रांना परवानगी देण्यास भाग पाडले, असा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे.