महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ ! तिसऱ्या लाटेपूर्वीच मे महिन्यात 34 हजारांवर मुलं ‘कोरोना’च्या विळख्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. रुग्ण संख्या कमी होत असतानाच महाराष्ट्रात आणखी एका संकटाने डोकं वर काढले आहे. महाराष्ट्रात मे महिन्यात तब्बल 34 हजार 486 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

देशात मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवीन रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा टप्पा गाठला होता. त्यामुळे राज्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. परंतु, राज्य सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन केले. तसेच आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. राज्यातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, आणखी एक संकट समोर आलं आहे. 1 मे ते 26 मे या कालावधीत राज्यात तब्बल 34 हजार 486 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही मुलं 10 वर्षापर्यंतची आहेत. यामुळे राज्याची चिंता अधिक वाढली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, 1 मे रोजी लागण झालेल्या एकूण बाधित मुलांची संख्या 1 लाख 38 हजार 576 एवढी होती. तर 26 मे पर्यंत हा आकडा वाढून 1 लाख 73 हजार 060 पर्यंत पोहचला. 1 मे पर्यंत राज्यात 11 ते 20 वयोगटातील रुग्णांची संख्या 3 लाख 11 हजार 455 इतकी होती. व 26 मे पर्यंत याच वयोगटातील रुग्णांची संख्या 3 लाख 98 हजार 266 इतकी झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बाधा होण्याची शक्यात देखील वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात असतानाच राज्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे राज्यासमोरील चिंता अधिक वाढली आहे.

म्हणून मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढली

मुलांच्या जन्मानंतर लहान मुलांना विविध लसीचे डोस दिले जातात. त्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांना घरातच खेळू द्या तसेच बाहेरच्या पदार्थांपासून लहान मुलांना दूर ठेवल्याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढली.