पुण्यात तरुणाईला ‘कोरोना’ची बाधा सर्वाधिक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विविध कामानिमित्त घराबाहेर पडणा-या 31 ते 40 वयोगटातील तरुणाईला पुण्यात कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचे समोर आले आहे. सप्टेंबरनंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग हीच त्रिसूत्री प्रभावी असल्याचा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण 9 मार्च रोजी आढळला. 9 मार्च ते 6 डिसेंबर या दरम्यान एकट्या पुण्यात कोरोनाच्या 1 लाख 72 हजार 78 रुग्णांची नोंद महापालिकेत झाली आहे. त्यापैकी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या 1 लाख 65 हजार 393 रुग्णांचे वयनिहाय विश्लेषण महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्यातून उत्पादनक्षम वयोगटात कोरोनाचा संसर्ग अधिक झाला आहे. पुण्यातील 22 टक्के संसर्ग 30 ते 40 टक्के वयोगटातील तरुणांना झाला आहे. मार्चपासून नोव्हेंबर पर्यंत सर्वाधिक रुग्ण याच वयोगटात आढळले आहेत. मात्र सप्टेंबरपर्यंत रुग्णांची संख्या दर महिन्याला सातत्याने वाढत होती. एप्रिलमध्ये 1 हजार 279 पैकी, 272 रुग्ण या वयोगटातील होते. सप्टेंबरमध्ये 51 हजार 515 होती. त्यात तरुण रुग्णांचे प्रमाण,11 हजार 813 असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यात पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे निरीक्षण आहे.

मुले, ज्येष्ठांचे प्रमाण कमीः पुण्यात कोरोनाचा सर्वात कमी संसर्ग वय वर्ष 20 पर्यंत आणि वयाची साठी ओलांडलेल्यांना झाला आहे. या दोन्ही वयोगटात घराबाहेर पडणा-यांची संख्या आजही कमी आहे.

शंभरीवरील तिघांना संसर्गः शंभरी ओलांडलेल्या तीघा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात एक रुग्ण 101 व 110 वयोगटातील होते. तर दो रुग्ण 110 ते 120 वयोगटातील होते. पुण्यात तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी दिसते, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख, डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.