“विश्वचषकात धोनीचं संघात असणंच विराटसाठी फायद्याचं”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विश्वचषकात भारतीच्या संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा समावेश असेल की नाही यावर शंका व्यक्त होत आहे. त्यावर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. धोनीचे विश्वचषकात असण हे विराटसाठी फायद्याचे आहे, असं गावसकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

कोणत्याही कर्णधाराला आपल्या संघात एका अनुभवी खेळाडूची गरज असते. कठीण प्रसंगामध्ये कर्णधार या अनुभवी खेळाडूकडून मदतीची अपेक्षा करत असतो. विराट कोहलीच्या भारतीय संघात सध्या ही भूमिका महेंद्रसिंह धोनी निभावतो आहे. गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यापासून ते विराटला महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये धोनी मदत करत असतो. याचमुळे विश्वचषकासाठी धोनीचं भारतीय संघात असणं हे विराटसाठी फायद्याचं आहे, असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

भारतीय संघात धोनीसारखा खेळाडू विराटच्या दिमतीला आहे ही त्याच्यासाठी सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे. आतापर्यंत अनेकदा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना धोनी संघाला पाठबळ देतो. यात धोनी विराटला क्षेत्ररक्षणातील बदलांपासून, गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यापर्यंत सर्व मदत करतो. या दोघांमधला मैदानातला ताळमेळ अतिशय उत्तम आहे. त्यांच्यातला हाच ताळमेळ भारताला विश्वचषक जिंकवून देऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.