भाजपला मोठा धक्का ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 आजी-माजी नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावमध्ये भाजपला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेने भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांना पक्षात दाखल करुन घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या 10 आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या 10 नगरसेवकांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे.

भाजपच्या 10 आजी-माजी नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे तब्बल 30 नगरसेवक आपल्या गळाला लावले. भाजपला हा मोठा झटका बसला होता. हे नगरसेवक शिवसेनेच्या तंबूत गेल्याने फुटीर नगरसेवकांना व्हीप न बजावता आल्याने भाजपने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.

जळगावच्या या घटनेतून भाजप सावरत असताना आता मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता मुक्ताई नगरपालिकाही भाजपच्या हातातून जाणार असे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगरमधून याआधी एकनाथ खडसे यांनी भाजपला धक्का दिला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर जळगावमध्ये भाजपला दोन मोठे धक्के बसले आहेत.