लाच म्हणून स्टेशनरी सामान स्विकारणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – लाच म्हणून पाचशे रुपयांचे स्टेशनरीचे सामानाची मागणी करून स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक दिलीप तुकाराम पवार (वय-32) आणि पोलीस शिपाई सर्जेराव आसाराम पुंगळे (वय-35) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार महेंद्र पांडे यांच्या हुंडाई कारचा अ‍ॅक्सल तुटून कार दुभाजकाला धडकून गाडीचे मोठे नुकसान झाले होते. हा अपघात शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास झाला होता. अपघातानंतर गाडीच्या नुकसानाबाबत तक्रार करण्यासाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रार नोंदवून विमा रक्कम मिळावी या करता नोंदीची प्रत सांक्षांकित करून देण्यासाठी तक्रारदार हे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी आणि पोलीस शिपाई पुंगळे यांनी तक्रारदार यांना 200 रुपयांची एक कागदाची रिम आणि पोलीस ठाण्यात दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या स्टेशनरी सामानाची लाच स्वरुपात मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पथकाने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वरुपात स्टेशनरी सामान घेताना पोलीस उपनिरीक्षक पवार आणि पोलीस शिपाई पुंगळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com