Mumbai News : नवऱ्याचे बँक स्टेटमेंट्स मिळवणं पडलं महागात, महिला चांगलीच आली ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  घटस्फोटाची केस कोर्टात सुरु असताना पोटगी मिळवण्यासाठी अवैध पद्धतीने नवऱ्याचं बँक स्टेटमेंट्स मिळवणं महिलेला चांगलच महागात पडलं आहे. महिलेने बनावट नोटीशीचा आधार घेऊन नवऱ्याचे बँक स्टेटमेंट्स मिळवले. या प्रकरणात सत्र न्यायालयाने महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

आरोपी महिला मुंबईतील खार येथील रहिवासी आहे. तिची 2012 पासून नवऱ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात केस सुरु आहे. यापूर्वी कौटुंबिक न्यायालयाने तिच्या मुलांना देखभालीचा खर्च देण्याचा निर्णय दिला. परंतु, तिचा खर्च देण्याची मागणी फेटाळली. या निर्णयाला आरोपी महिलेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना तिने तिच्या नवऱ्याचं, त्याच्या पालकांचं आणि कंपनीचे बँक स्टेटमेंट्स कोर्टात सादर केले.

आरोपी महिलेने कोर्टात बँक स्टेटमेंट्स सादर केल्यानंतर यावर नवऱ्याने आक्षेप घेतला. तिने हे स्टेटमेंट्स कसे मिळवले याची चौकशी व्हावी अशी मागणी नवऱ्याने केली. त्यानंतर आरोपी महिलेने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने बँकेला नोटीस पाठवल्याचे समोर आले. त्यानंतर पतीने माहिती अधिकाराचा वापर करुन ती नोटीस पोलिस स्टेशनमधून मिळवली.

ही नोटीस खोट्या कागदपत्राच्या आधारावर दिली गेल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीवर फसवणूक आणि खोटी कागदपत्र सादर केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेने खोटी कागदपत्र सादर करण्यासाठी कोणाची मदत घेतली याची चौकशी करण्यासाठी तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश उच्च न्यालयानं दिले आहेत.