सिलेंडर स्फोटात ४ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- चाळीतील घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुर्ला पश्चिम येथील जुना कंम्पाऊंडमधील बैलबाजार भागातील क्रांती नगरमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनुष्का चौरासिया असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, कुर्ला पश्चिमेकडील एका चाळीतील घरामध्ये संध्याकाळी ५.२१ वाजताच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घराला आग लागली. लागलेली आग भडकल्याने चार वर्षाची अनुष्का भाजल्याने गंभीर जखमी झाली.

अनुष्का चौरासिया हिला जखमी अवस्थेत तातडीने राजवाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे परिसारत हळहळ व्यक्त होत असून अनुष्काच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

दरोड्याचा कट पोलिसांनी उधळला

डोंबिवली : एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात रोजच घरफोडीच्या घटना घडत असताना दुसरीकडे पेट्रोल पंपावरदरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच  जणांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली. असून कल्याण न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खोणी तळोजा रोड येथील एका पेट्रोल पंपावरदरोडा टाकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील यांच्यासह पोलीस नाईक घोलप, थेरे, पोलीस हवालदार चव्हाण, खिल्लारे यांनी याठिकाणी सापळा लावला. यावेळी, महेंद्र सिंग (२५), सुशील शर्मा (२६), सतीश पटेल (२२), देवेंद्र सिंग (२७) आणि राजकुमार सोनी (३०, सर्व रा. उत्तरप्रदेश) यांना अटक करण्यात आली.