Coronavirus : राज्यात सर्वत्र ‘देऊळ बंद’, मात्र प्रसिध्द हाजी आली दर्गा ट्रस्टनं घेतला ‘अजब’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोनाने महाराष्ट्रात सुद्धा थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली असून, या व्हायरसने एकाचा बळी घेतला आहे.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा, महाविद्यालये, सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहे. तसेच राज्यातील लहान-मोठी मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. असे असताना मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्ट ने अजब असा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे दर्गा बंद न ठेवण्याचा. मात्र येथे येणाऱ्या भाविकांसाठी काही बंधन घालण्यात आल्याची माहिती हाजी अली दर्गा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी दिली आहे.

मोहम्मद अहमद ताहेर यांनी सांगितलं की, हाजी अली दर्गा येथे दररोज ५० हजारांहून अधिक भाविक येत असतात. या पार्श्वभुमीवर दर्ग्याची स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाइज करण्यात येणार आहे. तसेच दर्गा आधी भाविकांसाठी दिवसभरात १० ते ११ तास खुला असायचा. आता मात्र केवळ ४ ते ५ तास खुला ठेवण्यात येणार आहे. व नमाज पठनासाठीही कमीत कमी भाविकांना दर्ग्यावर येण्याचे आवाहन ट्रस्ट ने केलं आहे.

दरम्यान, कोरोना संसर्गाची भीती असताना देखील हाजी अली दर्गा बंद न ठेवण्याचा निर्णय ट्रस्ट च्या वतीने घेण्यात आल्याने, सगळीकडे तर्कवितर्क मांडले जात आहे.