डीएसकेंच्या पुतणीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; जामीन अर्ज केला मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठेविदारांची फसवणूक केल्याप्ररकणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या पुतणीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सई वांजपे असे या पुतणीचे नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

सई वांजपे या २०१८ पासून तुरुंगात होत्या. वांजपे यांच्यावतीने ॲड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. फुरसुंगी येथील शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ती जमीन डीएसके यांच्या कंपनीला जास्त भावात विकून त्यात नफा कमविण्याच्या आरोप सई वांजपे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आला आहे. वांजपे यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. फुरसुंगी जागेचे सर्व व्यवहार हे सहआरोपी बघत होते व त्या जागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठल्याही धनादेशावर वांजपे यांनी सही केली नाही, असा युक्तिवाद निकम यांनी केला.

वांजपे यांचे बँक खाते हे डीएसके यांच्या मेव्हणी हाताळत होत्या. जपे या व्यवहारामध्ये लाभार्थी नव्हत्या. त्यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपांच्या संदर्भात तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे नाहीत. वांजपे यांना एक लहान मुलगा आहे. त्या दोन वर्षापासून तुरुंगात आहेत म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात, यावा अशी विनंती ॲड. निकम यांनी न्यायालयास केली.

सकृत्दर्शनी गुन्हा सिद्ध होतोय : बचाव पक्ष
या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी वांजपे यांना जामीन देऊ नये व सकृत्दर्शनी त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध होतो, असा युक्तिवाद करत जामीन देण्यास हरकत घेतली. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर वांजपे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केला.