मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेने केवळ विकऐन्डलाच खवय्यांना एक खास भेट दिली आहे. मुंबईतील दुकानांना रात्री ११ वाजेपर्यंत आणि वाईन शॉप्स १०.३० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर उपहारगृह आणि बार रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यवसायांना पुर्वीचेच नियम लागू राहाणार आहे. कोविड काळात व्यवसायांवर असलेली बंधने ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत टप्प्या टप्प्याने शिथील करण्यात येत होती. २९ डिसेंबर रोजी राज्य सरकारने परीपत्रक प्रसिध्द करुन व्यवसाय कोविड पुर्व वेळेनुसार सुरु ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, कोविडच्या नियमावलीनुसार सुरक्षीत अंतर, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन ही नियमावली पाळणे बंधनकारक आहे.

तत्पुर्वी काही पब, बारमध्ये नियमबाह्य पध्दतीने गर्दी आणि पहाटेपर्यंत व्यवसाय करत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. नियमानुसार ठरवून दिलेल्या वेळेतच बँक्वेट हॉल्स खुले करण्याची परवानगी दिली आहे. त्यातही सामाजिक अंतर पाळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे बार, बँक्बेट हॉल्स आणि पबवर पालिकेचे लक्ष राहाणार आहे. त्यासाठी विभाग स्तरावर पथकही तयार करण्यात आले आहेत. हॉटेल्स, उपहारगृह, बार, बँक्वेट हॉल्स, फुड कोर्टना सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, दुकानांना सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. तर वाईन शॉप्स सकाळी १० ते रात्री १०.३० पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. या नियमांची अमंलबजावणी न करणाऱ्यांवर साथ नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच महानगर पालिका कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मुंबई महानगर पालिकेने आजपासून व्यवसायांच्या वेळा पुर्ववत करण्याची परवानगी दिली आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज या बाबात परीपत्रक प्रसिध्द केले आहेत.