किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी 23 कोटींचा निधी मंजूर – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई (Mumbai) : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंधीत गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिवनेरी गडकिल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण केले जाणार आहे. यासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपत त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray)
म्हणाले.

मंजूर झालेल्या निधीतून पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे पुनुरुज्जीवन, पाथवेंची सुधारणा, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, , रॉककट गुंफांचे पुनुरुज्जीवन, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा आदी विविध रस्त्यांची सुधारणा करणे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे आदी विविध कामे केली जाणार आहेत. या कामासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या कामाच्या मंजुरीसाठी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार मानले आहेत.