Sachin Vaze : सचिन वाझेला पोलिस दलातील कोणाचा ‘वरदहस्त’, मुंबईचे आयुक्त हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सचिन वाझे प्रकरणाचा गृह खात्याला अहवाल पाठवला असून त्यामध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घेतल्याचा ठपका ठेवला आहे. तत्कालीन गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्तांचा विरोध असतानाही वाझेला सिंग यांनी पोलीस दलात एंट्री दिल्याचे म्हंटले असून या अहवालाच्या आधारे टीव्ही ९ या वाहिनीने हे वृत्त दिले आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणानंतर बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप करत तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले. दरम्यान सरकारने हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी दिली होती. आता नगराळे यांनी सचिन वाझे प्रकरणाचा अहवाल गृह खात्याला सादर केला आहे. या अहवालात असे म्हंटले आहे की, परमबीर सिंग यांना सचिन वाझे एपीआय असतानाही थेट रिपोर्ट करायचा. सचिन वाझेकडे हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरूनच सोपवला जात होता असं या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. इतकचं नव्हे तर सचिन वाझेच्या टीममधल्या व्यक्तींनाही वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई होती. परमबीर सिंग यांच्यासोबत सचिन वाझेही मंत्र्यांच्या ब्रिफींगवेळी हजर राहायचे. विशेष म्हणजे सरकारी गाडी असतानाही वाझे कार्यालयात खासगी महागड्या गाड्यातून येत असे. निलंबित पोलीस अधिकाऱ्याला पुन्हा पोलीस दलात घेतल्यास त्याला महत्त्वाचं पद न देण्याचे संकेत आहेत, असे असतानाही सीआययूच्या प्रमुख पदाची जबाबदारी सचिन वाझेला दिली. याला पोलीस अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे सीआययूचे रिपोर्टिंग होतं.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांचा तपासासाठी परमबीर सिंग यांना एनआयएने चौकशीसाठी बोलवले आहे. त्यानुसार ते एनआयए कार्यालयात गेले आहेत. तसेच माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) प्राथमिक चौकशीत सिंग यांचा सविस्तर जबाब नोंदविला जाईल.

त्याचबरोबर परमबीर सिंग यांच्या पत्रात उल्लेख असलेले डीसीपी भुजबळ व एसीपी पाटील यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे हा एनआयएच्या कोठडीत आहे. त्यामुळे सुरुवातीला अन्य साक्षीदारांकडे चौकशी करण्यात येणार आहे त्यानंतर वाझेकडे चौकशी करण्यात येईल असे तपासी अधिकार्यांनी सांगितले.

परमबीर सिंग यांनी मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, अशा आरोपाचे पत्र मुख्यमंत्र्याना पाठवले. यामुळे राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडाली. त्या पत्राच्या आधारे सीबीआय चौकशी करण्याबाबत वकील जयश्री पाटील यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने मान्य करून त्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.