‘बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही’,परंतु… ! मुंबई पोलिसांचे भन्नाट ‘ट्विट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी अत्यंत भन्नाट कल्पना वापरल्या आहेत. ते ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षेच्या नियमांबद्दल जागरुक करत आहेत. यासाठी अनेकदा ते प्रसिद्ध चित्रपट, डायलॉग, अभिनेते यांचा वापर करत आहेत. आणि यावेळी मुंबई पोलिसांच्या मदतीला धावला आहे तो म्हणजे ‘बबड्या’.

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील बबड्या हे पात्र प्रसिद्ध झाले आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम उर्फ ‘बबड्या’ची भूमिका साकारत आहे. बबड्याचे हे पात्र नकारात्मक दाखवण्यात आले. त्यामुळे लोकांना त्याची चीड असून यावरुन अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत. आता मुंबई पोलिसांनी मात्र बबड्याचा फोटो ट्विट करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी बबड्याचा मास्क घातलेला फोटो ट्विट करत ‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना मास्क वापरत एक जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट लोकांना फार आवडले आहे.