Mumbai News : मनपा निवडणुकांपुर्वीच मुंबईत राजकीय वातावरण ‘गरम’, ‘येणार्‍या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिका आणि हाच गड उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरावून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार आखणी सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज मनसेची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मुंबई MIG क्लब येथे सदर बैठक पार पडेल. या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या भूमिकेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीस उपस्थित राहणार आहे.

तत्पूर्वी, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महालिकेतील सत्ताधाऱ्यांना म्हणजेच शिवसेनेला ‘वीरप्पन’ असे संबोधून टीका केली आहे. ट्विट करत देशपांडे म्हणाले, “वीरप्पन ने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्यापेक्षा जास्त सत्तेतील पक्षाने महानगरपालिकेला लुटलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच सर्वच पक्षांकडून महापालिका निवडणुकांसाठी जोरकसपणे मोर्चाबांधणी सुरु झाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार याचा विडा उचलला आहे.

तर दुसरीकडे शिवसेना सुद्धा महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे मात्र नक्की.