‘या’ तारखेपर्यंत मुंबईतील शाळा, महाविद्यालये बंदच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातही ६ जणांना या नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच अनुषंगाने मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार वाढू नये, म्हणून खबरदारीसाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा व महाविद्यालये १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेकडून घेतला आहे. त्याचसोबत, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या पूर्वनियोजित पुरवणी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे निर्देशही महापालिका शिक्षण मंडळाकडून देण्यात आले.

राज्यात आज ६८ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, राज्यात आज ३ हजार १८ रुग्णांची वाढ झाली. ५ हजार ५७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ६८ जणांचा मृत्यूही झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या १९ लाख २५ हजार ६६ वर गेली आहे. तर १८ लाख २० हजार २१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण मृतांची संख्या ४९ हजार ३७३ झाली आहे. सध्या ५४ हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्क्यांवर पोहचले आहे.