Pune : मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनीच काढला काटा ! चौघांना अटक

पुणे (खडकवासला) : पोलीसनामा ऑनलाईन – मैत्रिणीला अपशब्द वापरल्याच्या रागातून मित्रांनी मित्राला महारहाण करून त्याचा काटा काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यश मिलिंद कांबळे (वय 18 रा नांदेड) याचा खून झाला आहे. हवेली पोलिसांनी या खुनाचं गुढ उलगडलं आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मदन शाम गेंटाल (वय 24 रा गितांजली अपार्टमेंट, नांदेड फाडा, सिंहगड रोड), चमन नईम बागवान (वय 18, रा गौरी बिल्डिंग, सावंत पार्क, नांदेड तालुका हवेली) सुमित गंगाधर शेजवळ (वय 22 शेजवळ हाईट्स, नांदेड), आकाश दत्तात्रय घाडगे ( वय 20 रा मातोश्री निवास नांदेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आकाश घाडगे याला ताब्यात घेतल्यानंतर डीएसके विश्व येथे लपून बसलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कांबळे याचा मृतदेह नांदेड फाटा येथे शनिवारी सकाळी आढळून आला होता. मदन शाम गेंटाल याचे नांदेड फाट्याजवळ राहणाऱ्या एका मुली सोबत प्रेमसंबंध आहे. तीच मुलगी मला भेटत असल्याचं यश कांबळे यानं काही दिवसांपूर्वी चमन बागवान याला सांगितलं होतं. ही माहिती चमन यानं मदन गेंटाल, सुमित शेजवळ आणि आकाश घाडगे याला सांगितली शनिवारी रात्री 1 च्या सुमारास दारुच्या नशेत असलेल्या चौघांनी यश कांबळे याला नांदेड फाटा येथे बोलावलं. त्यानंतरही पाचही जण सुमित शेजवळ याच्या नांदेड फाट्याजवळ असणाऱ्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले. दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी यश कांबळे याला लाकडी दांडक्यानं आणि हातानं जबर मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी यशनं चौथ्या मजल्यावरून उडी मारली,. त्यात तो जबर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यशची हालचाल थांबल्यांच पाहून आरोपी लगेच फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक शेळके तातडीनं सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, पोलीस नाईक रामदास बाबर, संजय शेंडगे, गणेश धनवे, राजेंद्र मुंडे, संतोष भापकर, दिनेश कोळेखर, विश्वास मोरे व होमगार्डचे जवान यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. पुणे ग्रामीणचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली.

सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली. अतिरीक्त पोलीस अधीक्षक सई भोरे पाटील अधिक तपास करत आहेत.