लाहोरच्या उच्च न्यायालयाकडून परवेझ मुशर्रफ यांची ‘ही’ शिक्षा रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. परवेझ मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला असून पाकिस्तानातील विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठाने परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान याप्रकरणी परवेझ मुशर्रफ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता लाहोरच्या उच्च न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा देणाऱ्या विशेष न्यायालयाला लाहोर उच्च न्यायालयाने असंवैधानिक म्हटले आहे. त्यामुळे परवेझ मुशर्रफ यांच्यावरील संकट तूर्तास तरी टळले असून त्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. एकंदरीतच मुशर्रफ यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालू होता याचे कारण म्हणजे ते २००७ मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना त्यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यामुळे त्यांना या घडामोडींना सामोरे जावे लागले. परवेझ मुशर्रफ हे १९९९ ते २००८ या काळात सत्तेत होते. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ होती.

दरम्यान मुशर्रफ यांच्यावर गरज नसताना देशात आणीबाणी लादणे, सत्ता पालटणे, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशास अटक करणे तसेच संविधान नष्ट करणे असे काही आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या काळात २००७ मध्ये तब्बल १०० पेक्षा अधिक न्यायाधिशांना पदावरून हटवले होते. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद मधील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी याचिका दाखल केली होती. तसेच परवेझ मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी देखील खटला दाखल करण्यात आला होता.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/