आशिकी, साजन यांचे संगीतकार श्रवण यांना कोरोनाची लागण, प्रकृती नाजूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पाहायला मिळत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, संगीतकार श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. श्रवण यांना मुंबईतील एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक आहे.

संगीतकार नदिम श्रवण यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. या जोडीने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. याच जोडीतील श्रवण राठोड यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. दरम्यान, नदिम सैफी आणि श्रवण राठोड यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. ‘आशिकी’ या चित्रपटातील गीतांमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. गुलशन कुमार यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नदिम यांचे नाव आल्यानंतर ही जोडी तुटली. नदिम आता बॉलिवूडपासून दूर आहेत.

नदिम श्रवण यांच्या जोडीने ‘दिल है के मानता नही’, ‘साजन’, ‘सडक’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फुल और काटे’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जान तेरे नाम’, ‘धडकन’, ‘राजा’, ‘परदेस’, ‘दिलवाले’ यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले आहे. आजही त्यांची सगळीच गाणी हिट आहेत.