Pimpri News : पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरात गाडी चालवताना फोन बोलणाऱ्या 19 हजार जणांवर कारवाई

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रस्ते सुरक्षा हा सध्या सगळीकडे ऐरणीवरचा विषय झाला आहे. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे ही आता वाहनचालकांची सवय झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच गाडी चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाडी चालवताना फोनवर बोलण्यामुळे झालेल्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाहन चालवताना मोबाइलवर बोलण्यास मनाई असताना देखील काही महाभाग याकडे दुर्लक्ष करीत असतात. अशा 19 हजार 765 वाहन चालकांवर वर्षभरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाइलवर बोलणाऱ्या 19 हजार 765 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 39 लाख 52 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर 2019 मध्ये पोलिसांनी 56 हजार 797 जणांवर कारवाई करुन त्यांना 1 कोटी 23 लाख 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मोबाइलवर बोलणाऱ्या वाहनचालकाला 200 रुपये दंड केला जातो. ही कारवाई केवळ पोलिसांनी केलेली आहे. यापेक्षा कित्येकपटीने वाहनचालक बिनधास्तपणे वाहन चालवताना मोबाइलवर बोलताना शहरात अनेक ठिकाणी दिसतात.

मोबाइलवर बोलणे आणि वाहन चालविणे या दोन्ही क्रिया सोबत असतील तर सहाजिकच मोबाइलवर बोलण्याकडे चालकाचे अधिक लक्ष जाते. त्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात होतात. दुचाकी चालविताना मान वाकडी करुन खांदा आणि मानेमध्ये मोबाईल पकडून बिनधास्तपणे मोबाइलवर बोलत असतात. जीवापेक्षा कोणाचाही फोन इतका महत्त्वाचा कधीच नसतो. पण बहुतांश चालकांना याची जाणीव नसल्याचे दिसून येते. परिणामी स्वत: चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात.

वाहनचलकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:सह इतर वाहनचालकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. मोबाइलवर बोलत असताना दुचाकी चालक अचानक ब्रेक दाबणे, इंडीकेटर न लावता अचानक वळण घेणे, गतीरोधकावर वेग कमी न करणे, सिग्नल तोडणे असे प्रकार होतात. परिणामी अपघात होतात. याला आळा बसणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलिसांकडून कारवाई वाढवण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांनी सांगितले.