नागपूर पोलिसांकडून राज्यातील पहिली ‘डिजिटल चार्जशिट’ दाखल

ADV

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

देशाची ‘डिजिटल इंडिया’ अशी नवी ओळख होऊ पाहत आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व सरकारी यंत्रणांना देखील हळूहळू डिजिटल स्वरूप प्राप्त होत आहे. अशातच आता स्मार्ट व हायटेक अशी ओळख असलेल्या नागपूर पोलिसांनी राज्यातील पहिली ‘डिजिटल चार्जशिट’ न्यायालयात दाखल केली आहे. हा मान नागपुरातील यशोधानगर पोलिसांना मिळाला आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गांजाची पाकिटे चोरी केल्याच्या संशयावरून शेरु अली मेहबूब अली यांची ९ मार्चला रात्री १२ वाजताच्या सुमारास एकता कॉलनीत हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, उपनिरीक्षक रंदई, शिपाई लक्ष्मीकांत, मंगेश देशमुख, राजेंद्र चौगुले, किशोर बिवे यांनी तपास करून गोलू ऊर्फ कुणाल विद्याधर कांबळे, राहुल भीमराव इंगळे व कुणाल नरेंद्र वाघमारे या तिघांना अटक केली.

पोलिसांनी सुरुवातीपासून प्रथम खबरी अहवाल,घटनास्थळ पंचनामा, आरोपींचा कबुलीजबाब, जप्ती पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आदींसह संपूर्ण तपासाचे चित्रीकरण केले, संपूर्ण गुन्ह्याचे कागदपत्र व दोषारोपपत्राच्या चित्रीकरणासह’ डिजिटल चार्जशिट’ मंगळवारी न्यायालयात दाखल केली. यासाठी यशोधरानगर पोलिसांना पोलिस सहआयुक्त शिवाजी बोडखे, अतिरक्त पोलिस आयुक्त श्यामराव दिघावकर, उपायुक्त सुहास बावचे यांचे मार्गदर्शन मिळाले, अशी माहिती यशोधरानगर पोलिसांनी दिली.


फोटो प्रतीकात्मक आहे