लग्नाच्या काही दिवस आधी लैंगिक अत्याचार, बदनामीच्या भितीने तरुणीची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांवर लग्न आले असताना तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे नैराश्य आल्याने आणि बदनामीच्या भितीने तरुणीने रविवारी (दि.१७) रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी मौदा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर कुलरकर, राहुल कांबळी आणि श्याम कातोरे अशा तीन आरोपींना अपहरण आणि बलात्काराच्या प्रकरणात अटक केली आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी तिच्या ओळखीच्या मयूर कुलरकर नावाच्या तरुणाने तिला भेटण्यासाठी मारोडी बस स्टॉपजवळ बोलावले होते. पीडित तरुणी मयूरवर विश्वास ठेऊन त्या ठिकाणी भेटायला गेली. मयूरने त्याच्या आणखी दोन मित्रांच्या मदतीने तरुणीला एका फेब्रिकेशनच्या दुकानाच्या आवारात नेले. तिथे तिला बळजबरीने दारू पाजली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर त्या नराधमांनी तिला एका नंबरप्लेट नसलेल्या गाडीमधून अज्ञात स्थळी घेऊन जात होते. नशेत असलेले नराधम पुन्हा आपल्यावर बलात्कार करतील या भीतीने गाडीमध्ये त्या तरुणीने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी तिला मध्यरात्री महामार्गावर गाडीतून ढकलले.

पहाटे तीनच्या सुमारास महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना ही तरुणी दिसली. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली. त्यावेळी तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
दरम्यान, बलात्काराचे प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर आणि स्थानिक वर्तमानपत्रात त्यासंदर्भातली बातमी प्रकाशित झाल्यानंतर पीडित तरुणी खूप तणावात होती. पीडित तरुणीचे पुढील महिन्यात १० तारखेला लग्न होणार होते. या घटनेमुळे तिने लग्नाच्या काही दिवस आधीच रविवारी संध्याकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पीडितेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या आईला उद्देशून लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये मुख्य आरोपी मयूरला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी मित्राला भेटायला गेल्यामुळे आईची माफीसुद्धा मागितली आहे.