बेरोजगार अभियंत्यांना साडेपाच कोटीची कामे लॉटरी पद्धतीनं वितरीत

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांना काम देण्याचे काम महावितरणच्या नागपूरमधील ग्रामीण मंडल कार्यालयाने केले आहे. त्यांनी 67 विद्युत शाखेतील पदवीधारकांना जवळपास साडेपाच कोटी रुपयांची कामे दिली आहेत.

महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये मध्ये अशा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक जणांनी महावितरणच्या कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी केली होती. यानुसार नागपूरच्या काटोल रोड मधील कार्यालयात लॉटरी पद्धतीने कामासाठी 78 सुशिक्षित बेरोजगारांनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यानुसार काल यातील 67 अभियंत्यांना काम देण्यात आले. यामध्ये 22 नवीन अभियंत्यांना 1 कोटी 81 लाख रुपयांचे तर 45 जुन्या अभियंत्यांना 3 कोटी 72 लाख रुपयांचे काम देण्यात आले.

या कामांचा समावेश –

या अभियंत्यांना देण्यात आलेल्या कामामध्ये जिल्हा विकास नियोजन विकास समितीच्या कामांचा समावेश आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनेस वीजपुरवठा करणे, नवीन पथदिव्यांची उभारणी करणे, नवीन भूमिगत वाहिन्या टाकणे, नवीन रोहित्र उभारणे यांसारख्या कामाचा समावेश आहे.

दरम्यान, काल झालेल्या कार्यक्रमात एकूण साडेपाच कोटींची कामे देण्यात आली असून या वर्षी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 9 कोटी रुपयांची कामे देण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्यासह विविध आधिकारी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –