विद्यापीठ संकेतस्थळावरून हटले झाकीर नाईकचे नाव

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विशेष कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत महात्मा गांधींपासून लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. या यादीत वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक याचेही नाव देण्यात आले होते. त्यामुळे संताप व्यक्त होऊन नाईकचे नाव यादीतून काढून टाकण्याची आग्रही मागणी शनिवारी सिनेट सदस्यांनी केली. प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ही मागणी मान्य आणि प्रशासनाने पाच मिनिटांतच त्याचे नाव यादीतून काढून टाकले.

मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यापीठाच्या जुन्या आणि नवीन संकेतस्थळावर या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत त्यांनी केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्याची सचित्र ओळख करून देण्यात आली आहे. यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांपासून विविध क्षेत्रातील नामवंतांची माहिती आहे. या यादीत परदेशात पळून गेलेला आणि दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेला डॉ. नाईकच्याही नावाचा समावेश होता. हे नाव तातडीने हटवावे, अशी मागणी युवा सेना सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली आणि ती तातडीने मान्य करण्यात आली.