नरेंद्र पाटलांना शिवसेनेला ‘रामराम’; पक्ष सोडताच म्हटले…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज शिवसेनेला ‘रामराम’ ठोकला. त्यानंतर पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीतील नेत्यांनी मागील सरकारच्या कालावधीतील नेत्यांना बाजूला सारण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्र्यांना माझ्या विरोधातही भडकवण्यात महाविकास आघाडीतील नेते यशस्वी ठरल्याचा आरोप केला.

नरेंद्र पाटील यांनी खासदारकीची निवडणूकही लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही कालावधीपासून ते शिवसेनेत होते. तसेच त्यांनी काल (मंगळवार) शिवसेना सोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ते शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. ते म्हणाले, ‘मी राष्ट्रवादीत असतानाही माझी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन मी शिवसेनेकडून खासदारकीही लढवली. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे होते. मात्र, त्यांनी महामंडळ बरखास्त केले.

दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, ‘भाजप पक्षासाठी आपण काम करणार असून, आमचे नेते देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्षप्रवेश करेन’ असेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

उदयनराजेंच्या गळाभेटीच्या व्हिडिओबाबत म्हणाले…
उदयनराजे भोसलेंच्या गळाभेटीच्या व्हायरल व्हिडिओबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. प्रवासात असताना योगायोगाने उदयनराजे भोसले यांची भेट झाली, असे ते म्हणाले.