महाराष्ट्राची पोरं हुश्शार…!झळकली नासाच्या कॅलेंडरवर 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील नासाने बारा महिन्यांचं एक थीम कॅलेंडर काढलं आहे.नासाच्या २०१९ च्या वार्षिक कॅलेंडरवर जगभरातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र लावण्यात आली आहे. या कॅलेंडरच्या कव्हर पेजवरील चित्र उत्तर प्रदेशातील नऊ वर्षांच्या दीपशिखानं रेखाटलं आहे. एकूण तीन भारतीय मुलांनी काढलेली चित्र या कॅलेंडरमध्ये झळकली आहे.

अंतराळ विज्ञान ही थीम असलेल्या कॅलेंडरमध्ये या  तिघांच्या चित्राचा समावेश करण्यात आला आहे.  दिपशिखाने रेखाटलेले अंतरिक्षातील वैज्ञानिक आश्चर्यांकडे कुतुहलाने पाहणाऱ्या मुलीच्या चित्राची निवड मुखपृष्ठासाठी करण्यात आली आहे.आणि महाराष्ट्रातील १० वर्षांच्या इंद्रयुद्ध आणि ८ वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र या कॅलेंडरमध्ये आहे. अंतराळातील जीवन आणि तिथं चालणारं काम या विषय केंद्रस्थानी ठेऊन दोघांनी चित्र रेखाटलं आहे.

तसेच याशिवाय तामिळनाडूतील थेमूकिलिमनने रंगवलेलं स्पेस फूड हे चित्रही या कॅलेंडरमध्ये झळकलं आहे. याशिवाय जगातील इतर ही देशातील मुलांच्या  चित्राचा या  कॅलेंडरमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यावर्षी या कॅलेंडरसाठी नासाने चित्रकला स्पर्धाच आयोजित केली होती.

अंतराळस्थानकात वास्तव्यात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचावं, या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.