Coronavirus : ‘कोरोना’च्या लढाईसाठी कैद्यांकडून 2 लाख 77 हजाराचा निधी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात तीन हजार बंदी आहेत. न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले पक्के आणि न्यायालयात सुनावणी सुरु असलेले कच्च्या कैद्यांचा यामध्ये समावेश आहे. शिक्षा झालेल्या पक्क्या कैद्यांना कायद्यानुसार काम द्यावे लागते. नाशिक रोड कारागृहातील सुतार, लोहार, विणकाम, मूर्तिकार, रसायन, बेकरी आदी दहा कारखान्यांतून काम आणि कारागृहाच्या शेतीत काम करणाऱ्या या कैद्यांना पगार दिला जातो. शिक्षा, संपल्यावर आणि गरजेच्या वेळी कारागृह प्रशासनाकडून कैद्यांना पगार दिला जातो.

देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगी देण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अधीक्षक प्रमोद वाघ आणि अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले. त्याला कैद्यांनी प्रतिसाद देत त्यांच्या पगारातील 100 रुपयांपासून एक हजारापर्यंतची रक्कम सरकारला देण्याचे ठरविले. त्यानुसार 2 लाख 76 हजार 957 रुपयांच्या निधीचा धनादेश सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यापूर्वी नाशिक रोड कारागृहातील कैद्यांनी केरळच्या पूरग्रस्तांना दोन लाखांचा निधी दिला होता. तर कारागृहातील कर्मचारी व अधिकारी त्यांचा एक दिवसाचा पगार शासनाला देणार असल्याचे प्रमोद वाघ यांनी सांगितले.

कोरोना व्हायरस विरुद्ध सुरु झालेल्या लढाईत आतापर्यंत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड कलाकारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करत आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनीही कोरोनाविरुद्ध लढाईत आपले योगदान देऊन इतरांपूढे आदर्श ठेवला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत आतापर्यंत उद्योगपती, देवस्थान ट्रस्ट, सामाजिक संस्था यांनी मदत निधी सरकारला दिला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like