धक्कादायक ! नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासमोर महिलेने घेतलं स्वत:ला पेटवून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहित मुलीच्या कौटुंबिक वादाला कंटाळून 55 वर्षीय एका महिलेने स्वत:ला पंचवटी पोलीस ठाण्यासमोरच पेटवून घेतले. या धक्कादायक प्रकारात ही महिला होरपळली आहे. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंटवटीतील टकले नगर येथील 27 वर्षीय अमनप्रित संधू हिचा विवाह गेल्या महिन्यात छत्तीसगडच्या राजपूरमधील राजिंदर पाड्डा याच्याशी झाला होता. हा विवाह त्या तरुणीच्या इच्छेविरोधात लावून दिला होता. लग्ननंतर आठवड्याभरात तरुणीचा पतीशी वाद होऊ लागला. पतीकडून तरुणीला शिवागाळ आणि मारहाण होऊ लागली.

दोन दिवसांपूर्वी तरुणीने घर सोडलं आणि तिच्या मैत्रिणीकडे येऊन राहू लागली. आज तरुणीचे वडील पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर मुलीला पोलिसांनी बोलावून घेतले. मुलगी पोलीस ठाण्यात आली. तिच्याकडे विचारणा करण्यात आल्यावर मुलीने वडीलांच्या घरी आणि रायपूरला पतीकडे जाण्यास नकार दिला. हा वाद मुलीच्या आईला असहाय्य झाला.

त्यामुळे आईने दिंडोरी रस्त्यावरील पंटवटी पोलीस ठाण्यासमोरच स्वत:ला पेटवून घेतले. यात ही महिला होरपळली असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.