अटक न करण्यासाठी लाच घेताना तिघे पोलीस ACB च्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

नाशिक : दुचाकी अपघातात अटक करण्याची भिती दाखवून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सातपूर पोलीस ठाण्यातील तिघा पोलीस कर्मचार्‍यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस चौकीत सापळा लावून रंगेहाथ पकडले.

पोलीस नाईक हिरामण गणपत सोनावणे, सारंग एकनाथ वाघ आणि पोलीस शिपाई राहुल पोपट गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यात दुचाकीस्वाराला अटक करण्याची भिती दाखवून अटक करु नये, यासाठी या पोलिसांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी करताना पहिला हप्ता म्हणून १३ हजार रुपये देण्याचे ठरले. उर्वरित १२ हजार रुपये बुधवारी देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातपूर पोलीस चौकीत सापळा रचला. तक्रारदाराकडून रात्री साडे आठ वाजता १३ हजार रुपये स्वीकारताना तिघांना पकडण्यात आले.