नाशिकमधील दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंकडून दु:ख व्यक्त; केली ‘ही’ मोठी घोषणा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   नाशिकमध्ये रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकमधून गळती झाली. त्यामुळे या दुर्घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणाही केली.

राज्यात कोरोना व्हायरसचे थैमान सुरु आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्सची कमतरता भासत आहे. त्यातच नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाला होता. त्यामुळे सर्वत्र गॅस पसरला होता. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर आहेत. तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यातच रुग्णालयातील ऑक्सिजन टँक लीक झाल्याने तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. या प्रकारानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

यावर भाष्य करत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. त्यामध्ये म्हटले, की नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळजी आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल’.