Lockdown : पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर मुख्यमंत्री पेमा खंडू यांचे ट्विट, ‘लॉकडाऊन संपल्यानंतरही खबरदारी घ्यावी लागेल’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात कोरोना विषाणूचे संकट हळूहळू अधिक तीव्र होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत पीएम मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेतला. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही बैठकीला हजेरी लावली.

पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर अरुणाचल प्रदेशचे सीएम पेमा खांडू यांनी ट्वीट केले की, लॉकडाउनची मुदत १५ एप्रिल रोजी संपत आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण रस्त्यावर मोकळेपणाने चालू लागतो. आपल्याला अशीच खबरदारी घ्यावी लागेल. लॉकडाउन आणि सामाजिक अंतर हे कोरोनाशी लढण्याचे एकमेव प्रभावी मार्ग आहेत. तसेच, यापूर्वी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्यातील कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबद्दल दूरध्वनीवर चर्चा झाली.

दरम्यान, २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूच्या दोन दिवस आधी २० मार्च रोजी पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी कोरोनाच्या जागतिक धोक्याबद्दल मुख्यमंत्र्यांना ताकीद दिली आणि म्हणाले की, संपूर्ण देशाने एकत्रित येऊन त्याचा सामना करण्याची गरज आहे. २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाउनची अंमलबजावणी झाल्यानंतर, राज्यांना घरी आणि गावात परतणाऱ्या लोकांमुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. दरम्यान, कॅबिनेट सचिव आणि गृह सचिव राज्यांच्या मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याशी बोलणी करून परिस्थितीचा सतत आढावा घेत आहेत आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दररोज नवीन पावले उचलली जात आहेत.

भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत असून सध्या देशात कोरोना विषाणूची १७६४ सक्रिय प्रकरणे आहेत, तर मृतांचा आकडा ५० वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाने सकाळी ९ वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या १२ तासांत देशात १३१ नवीन कोरोना विषाणूची नोंद झाली आहे. यामुळे भारतात कोरोना विषाणूच्या ऐकून १९६५ घटनांची नोंद झाली असून त्यापैकी १५१ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.