‘फडणवीसजी, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय? गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणावरून महाआघाडी सरकारवर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारकडे बोट दाखवतंय. केंद्रानेच सगळं करायचं आणि आम्ही मात्र राज्यात माशा मारत बसायचं. दिलेले आरक्षण गमवून बसायचं असं किती दिवस चालणार अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर घणाघात केला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत फडणवीसांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाने माशा मारणे स्पर्धाही भरवावी! असा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, केंद्र सरकारने घटनेच्या कलम १०२ मध्ये दुरुस्ती केली. त्यानंतर कुठल्याही समाजाला मागास घोषित करण्याचा अधिकार राज्याकडेच राहील असेही स्पष्ट केले. परंतु. सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात यासंदर्भात एकमत झाले नाही. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. परंतु राज्य सरकारने तसे न करता टाइमपास करत राहिले, अशी टीका त्यांनी केली होती.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा भांडाफोड झाली आहे. त्यातच सत्ता नाही ती मिळवणेही शक्य नसल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. ते बेताल वक्तव्ये करत असून ते सैरभैर झाले आहेत. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी मला अपेक्षा आहे असा टोला मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला लगावला.