शहर अध्यक्ष ठरविण्याचे सर्वाधिकार अजित पवारांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षपदी लवकरच नवा चेहरा देऊ अशी घोषणा अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केली होती.त्यानुसार आज पुण्यात आलेल्या बैठकीत अजित पवार शहर अध्यक्षपदासाठी जे नाव सुचवतील. त्याच्या सोबत काम करण्याचा ठराव एकमुखाने करण्यात आला. प्रदेश अध्यक्षांची निवड 29 एप्रिल रोजी होणार असल्याने त्याचवेळी शहर अध्यक्षपदाचे नाव देखील जाहीर केले जाईल.अशी माहिती राज्यसभा खासदार आणि शहर अध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिली.

गतवर्षी झालेल्या पुणे महानगरपालिकेतील निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवला होता. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.या राजीनाम्यानंतर शहर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला. त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे अध्यक्षपद असणार असे जाहीर करण्यात आल्यानंतर शहर अध्यक्ष बदलणार या चर्चा थांबल्या.

या सर्व घडामोडी होऊन वर्षभराचा कालावधी होत नाही, तोवर राज्यसभेच्या खासदारपदी पुन्हा वंदना चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठवण्याचा निर्णय घेतला आणि त्या निवडणुकीत बिनविरोध विजयी देखील झाल्या. त्यानंतर शहर अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चर्चा होण्यास सुरुवात झाली. मागील महिन्यात पीडीसीसी बँकेत हल्लाबोलनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीत शहर अध्यक्षपदासाठी नवा चेहरा देऊ असे जाहीर केले.या घोषणेनंतर पुन्हा चर्चेला सुरुवात झाल्याचे पाहावयास मिळाले.

आज पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.असा ठराव करण्यात आला.या पदासाठी माजी उपमहापौर दीपक मानकर,माजी महापौर प्रशांत जगताप,विशाल तांबे,सुभाष जगताप यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांची निवड 29 तारखेला होणार असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष कोणाला संधी देते हे पाहावे लागणार आहे.