प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘संभाव्य’ मंत्र्यांची यादी घेऊन पोहचले शरद पवारांच्या घरी

नवी दिल्ली : वृत्तसंथा – राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटणार असल्याचे समजते. आघाडीमध्ये काल झालेली बैठक सत्ता स्थापनेसाठी सकारात्मकता दाखवणारी ठरली आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे संभाव्य मंत्रांची यादी घेऊन शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचे समजते आहे.

मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे एकूण 15 मंत्री असतील, मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि नवाब मलिक, धनंजय मुंडे यांचा सहभाग असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते.

राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदात मिळणार वाटा ?
राष्टवादी आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फारसा फरक नाही त्यामुळे राष्ट्रवादीकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी विचारणा केली जात असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. सत्ता स्थापनेमध्ये 50-50 फॉर्म्युला ठरला असून मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म शिवसेनेला देण्यात येणार असल्याची माहिती वड्डेट्टीवार यांनी दिली होती. त्यामुळे दुसऱ्या टर्मसाठी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे येणार असल्याचे समजते. हा फॉर्म्युला यशस्वी झाल्यास तब्बल वीस वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात पुन्हा होईल. त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आहे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com