‘…तर आपण फासावर जाण्यास तयार’, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मेहबूब शेख यांनी १४ नोव्हेंबरला रात्री भेटण्यासाठी बोलावून घेतलं आणि गाडीतून निर्जनस्थळी नेत बलात्कार केल्याची तरुणीची तक्रार आहे. तरुणीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद पोलिसांनी तपास करण्यासाठी तीन पथकं तयार केली आहेत.

दरम्यान, मेहबूब शेख यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, “गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून मिळाली. यानंतर मी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करुन माहिती घेतली. तपास अधिकाऱ्यांना फोन करुन माझी तक्रारदार तरुणीशी काहीच ओळख नसून कधीही भेटलो नाही अशी माहिती दिली. माझे फोन रेकॉर्ड तपासा, हवं तर नार्को टेस्ट करा असं सांगितलं”. मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

“सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा राजकारणात मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याचं राजकीय करिअर अशा खोट्या केसेस करुन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर हा दुर्दैवी प्रकार आहे. मी दोषी असलो तर कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. खोट्या केसेस करून फक्त राजकीय द्वेषापोटी कोणी केलं आहे का याचाही पोलिसांनी तपास करावा,” तसंच दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी हा प्रकार झाल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. मात्र त्या दिवशी मी शिरूर-कासार या गावातच होतो,” असा दावा त्यांनी केला. असे खोटे आरोप करुन एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करु नका”, अशी विनंती मेहबूब शेख यांनी यावेळी केली.

राजकारण करायचं असेल तर त्यासाठी अनेक गोष्टी आहेत सांगताना त्यांनी तक्रारीत उल्लेख असणारा मेहबूब शेख कोण आहे याचा शोध घ्या अशी विनंती पोलिसांना केली. सोबतच महिलेची नार्को टेस्ट करण्याची आणि तिचा बोलवता धनी कोण आहे याची माहिती घ्या अशी मागणी केली. पुरावा सापडल्यास आपण फासावर जाण्यास तयार आहे असंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलत असतानाच मेहबूब शेख यांना अश्रू अनावर झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासेही या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. “भाजपा राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे. फायदा घेण्यासाठीच प्रकरणाला राजकीय वळण दिलं जात आहे,” आरोप महेश तपासे यांनी केला. तसंच पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर मेहबूब शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती महेश तपासे यांनी दिली आहे.