Nawab Malik : पंतप्रधान अनेक राज्यात निवडणूक सभांचा धुरळा उडवत फिरणार अन्…;

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दिल्लीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. ‘दिल्लीने आता कोरोना नियंत्रणात कसा आणायचा ते महाराष्ट्राकडून शिकावे’ असे मलिक म्हणाले.

कोरोना परिस्थितीविषयी बोलताना मलिक म्हणाले, दिल्लीत बहुसंख्य लोक कोरोना संपला असे मानून मास्क वापरत नव्हते. कोरोनाच्या कोणत्याच नियमांचे पालनही होत नव्हते. इतकेच नाही तर स्विमिंग पूलही उघडण्यात आले होते. पंतप्रधान अनेक राज्यात निवडणूक सभांचा धुरळा उडवत फिरणार आणि लॉकडाउन हा अंतिम पर्याय असल्याचे राज्यांना सांगणार. उत्तर प्रदेशमध्ये उच्च न्यायालयानेच लॉकडाऊन जाहीर केले. काही राज्यात आता लॉकडाऊन जाहीर झाला तर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक बनत आहे. दिल्लीची जबाबदारी आता कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला.

कोरोना भेदभाव करत नसतो

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह डझनभर सनदी अधिकाऱ्यांसह 28 हजारांहून अधिक लोकांना कोरोना झाला आहे याचे उत्तर कोण देणार? असा सवाल राज्यातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर केला. त्याला उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘कोरोना सनदी अधिकारी, श्रीमंत किंवा गरीब असा भेदभाव करत नसतो’.

महाराष्ट्राकडून शिकावे

25 वर्षांपुढील सर्वांना लस द्यावी, अशी महाराष्ट्राकडून सातत्याने मागणी होत होती. आता पंतप्रधानांनी 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. कोरोना नियंत्रणावरून आता तरी दिल्लीने महाराष्ट्रावर टीका करू नये. कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर महाराष्ट्राकडून नक्कीच शिकण्यासारखे आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.