शरद पवारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिला सल्ला, म्हणाले – ‘तुमच्या वयाला शोभत नाही’

पुणे : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे. भारतात याचे पडसाद उमटणे स्वाभाविकच आहे. सोशल मीडियावर सुद्धा अमेरिकन निवडणुकीवर जोरदार चर्चा सुरू आहे. आता या बहुचर्चित निवडणुकीची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही घेतली आहे. पराभव होऊनही तो मान्य न करणारे अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पवार यांनी सल्ला दिला आहे.

पुणे येथील अमनोरा पार्क येथे छत्रभुज नरसी आंतरराष्ट्रीय स्कूलच्या भूमिपूजन समारंभास शरद पवार उपस्थित होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करण्यास तयार नाहीत, याबाबत प्रतिक्रिया विचारली असता पवार म्हणाले, जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखली जाते. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल काहीही असला तरी विजय मिळाला नाही म्हणून नाउमेद होऊन टोकाची भूमिका घेऊ नये.

निवडणुकीत विजयी करणे किंवा पराभूत करणे हा लोकांचा अधिकार आहे. निर्णय इतका स्वच्छ लागल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्ये करणे त्यांच्या वयाला शोभत नाही. मी 14 वेळा निवडणुकीत उभा राहिलो, असे ते म्हणाले. पण लोकांनी कधी पाडलं नाही, असेही पवार म्हणाले.

तेजस्वींचे यश तरूणांना नवी उमेद देणारे
बिहार निवडणुकीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, तेजस्वी यादव यांना जे यश मिळाले आहे ते खूप चांगले आहे. यामुळे अनेक तरुणांमध्ये उमेद निर्माण होईल. कारण, मी संपूर्ण प्रचारमोहीम पाहिली. त्यानुसार स्वत: पंतप्रधान यामध्ये खूप रस घेत होते. यामुळे एका बाजूला पंतप्रधान आणि नितीश कुमारांसारखे अनुभवी नेते आणि दुसर्‍या बाजूला अनुभव नसलेले व पहिल्यांदाच निवडणूक लढणारे तेजस्वी यादव होते, हे चित्र आशादायक आहे.

फडणवीसांना टोला
राज्यातील नेते बिहार निवडणुकीतील भाजपाच्या यशाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांनाही देत आहेत. यावर पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे. बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, आज जरी बदल झाला नसला तरी हळूहळू बदल होत असल्याची वाट दिसू लागली आहे. नितीश कुमार यांना अजिबात फटका बसणार नाही असे सांगितले जात आहे. भाजपाची संख्या वाढली, पण नितीश कुमार यांची संख्याही कमी झाली आहे. तेजस्वी यादव यांना जितके मोकळे हात मिळतील तेवढे चागले असे मत होते, त्यामुळे तिथे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता, असेही पवार म्हणाले.

राज्यापालांवर अर्णब प्रकरणावरून पुन्हा निशाणा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, राज्यपालांनी अर्णब गोस्वामी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटते की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगले वाटले असते. नाईक कुटुंबियांसोबतचा माझा फोटो पाच वर्षांपूर्वीचा आहे, असेही पवार म्हणाले.