राज्यात शिवसेनेसोबत आघाडी असताना ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रवादीने भाजपला दिली साथ, शिवसेना मोठ्या अडचणीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीला भाजपला सर्वाधिक जागा मिळूनसुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले होते. तशीच काहीशी अवस्था नगर जिल्ह्यात शिवसेनेची झाली आहे. महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनसुद्धा शिवसेनेला सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. राज्यात शिवसेनेसोबत आघाडी असताना नगरमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेला आशा होती कि, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर यात सुधारणा होईल पण याचा काही फायदा झाला नाही. स्थायी समिती सभापतीच्या निवडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला साथ देत शिवसेनेला दणका दिला आहे.

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अविनाश घुले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्याला भाजपने साथ दिली आहे. या अगोदर २०१८ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला साथ दिल्याने बाबासाहेब वाकळे महापौर झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात या दोन्ही पक्षांना यश आले आहे. मागच्या निवडणुकीत राज्यात सत्तांतर आणि राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले आहे. पण तरीसुद्धा नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीची मैत्री अजून टिकून राहिली आहे. या शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार आहेत. तेच महापालिकेच्या राजकारणाचे सूत्रधार आहेत.

२०१८ची महापालिका निवडणूक
२०१८ मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. यामध्ये शिवसेनेला २४,राष्ट्रवादी १८, भाजपने १४, काँग्रेसने ५ आणि बसपाने ४ जागा जिंकल्या होत्या. तसेच समाजवादी पक्षाने १ तर २ जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदी बसवले. त्यानंतर राष्ट्रवादीला इतर पदे मिळाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीने भाजपची साथ सोडून शिवसेनेला सोबत घयावे अशी मागणी करण्यात येत होती. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. नगरमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात पारंपरिक वैर आहे. हे वैर पक्षावरून नव्हे तर जगताप कुटुंबीय आणि शिवसेना नेते, माजी आमदार अनिल राठोड यांच्यातील वैयक्तिक वैर आहे. त्यानंतर अनिल राठोड यांच्या निधनानंतर हे वैर संपेल असे अनेकांना वाटत होते मात्र हे वैर अजून संपलेले नाही हे सभापतिपदाच्या निवडणुकीवर स्पष्ट झाले आहे.

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभापतिपदासाठी नगरसेवक अविनाश घुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गुरूवारी स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक घेतली जाणार आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ५, भाजपचे ४, तर काँग्रेस व बसपचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. मागच्या वेळी स्थायी समिती सभापती पदापासून शिवसेनेला दूर ठेवण्यात भाजप आणि राष्ट्रवादीला यश आले होते.

ऐनवेळी भाजपचे मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सभापतिपद मिळविले होते. यावेळीसुद्धा राष्ट्रवादीचा सभापती होण्याची शक्यता जास्त आहे. आता शिवसेनेकडून यावर काय भूमिका घेण्यात येते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार आहे. नगरमध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीत कट्टर वैर आहे. त्यांच्यातील वैराचा फायदा सध्या भाजपला होत आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा विषय राज्यपातळीवर नेला पण त्याचा काहीही फायदा झाला नाही.