ATM सेंटरमध्ये जाऊ शकत नसाल तर ‘या’ 5 पध्दतीनं घर बसल्या करा पैशाची व्यवस्था, कुठल्याही टेन्शनविना, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन करण्यात आले आहे. अशा वेळी तुम्हाला जर काही कामासाठी रोकड हवी असेल आणि तुमच्याकडे रोकड नसेल तर घाबरू नका. कारण असे अनेक पर्याय आहेत, ज्यांचा वापर करुन तुम्ही एटीएममध्ये न जाता घरात बसून पैशांची व्यवस्था करू शकता. आपण पोस्ट ऑफिसमधून किंवा पोस्टमनला कॉल करून पैसे काढू शकता. पैसे काढणे आणि ठेवींसह अनेक सुविधा आपल्या घराजवळ उपलब्ध असतील. जर आपण आपल्या बँक खात्यास Google पे, फोन पे किंवा व्हॉट्सअ‍ॅप पे सारख्या वॉलेटशी जोडले असेल तर आपण घराच्या आसपास रोख रक्कम काढू शकता.

पोस्टमनकडून मिळू शकतात पैसे

टपाल विभागाच्या म्हणण्यानुसार, आजकाल त्यांच्या बहुतेक पोस्टमनकडे हँड हेल्ड डिव्हाइस आहेत. त्याच्याकडून आपण घरी बसून 10 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू शकता. आपल्याला आपल्या पोस्टमनचा फोन नंबर माहित असल्यास त्यांना कॉल करा अन्यथा थेट आपल्या पोस्ट ऑफिसला कॉल करा. पोस्ट ऑफिसमधील कोणताही कर्मचारी हँड हेल्ड डिव्हाइस घेऊन आपल्या घरी उपस्थित होईल.

आजकाल लॉकडाऊन आणि सामाजिक अंतर लक्षात घेऊन कोणालाही अडचण होऊ नये म्हणून टपाल कार्यालयांमध्ये अतिरिक्त रोकडची व्यवस्था केली आहे. सध्या देशभरात 1.55 लाखाहून अधिक पोस्ट कार्यालये आहेत. या व्यतिरिक्त, जवळपासच्या पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या ग्रामीण भागातही उप पोस्ट कार्यालय कार्यरत आहे. प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये किमान पाच पोस्टमन असतात. म्हणूनच, पोस्ट ऑफिस क्षेत्रात कोठेही रोख रकमेची समस्या असेल, तर ती सोडविता येईल.

पे नियरबायच्या आउटलेटव्दारेही काढू शकता पैसे

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केलेल्या आधार सक्षम पेमेंट सिस्टम अंतर्गत नोंदणीकृत पे नियरबाय आउटलेटव्दारे देखील पैसे काढणे शक्य आहे. सध्या देशात सुमारे 8 लाख आउटलेट्स आहेत, ज्यास डिजिटल हेड म्हणतात. तिथे जाऊन आधार क्रमांक आणि अंगठा लावून पैसे काढता येतात.

गुगल पे सोबत लिंक आहे खाते तर काढू शकता पैसे

पे नियतबायचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणतात की, जर आपण आपल्या बँक खात्याला Google पे, फोन पे, व्हॉट्सअ‍ॅप पे सारख्या वॉलेटशी जोडले असेल तर डिजिटल क्यूआर कोड वाचून खात्यातून पैसे काढू शकता. यात आपण गुगल पेचा क्यूआर कोड वाचून खात्यातून जास्तीत जास्त पैसे काढू शकता.

आधारमधून कोणती सुविधा असेल?
एनपीसीआयच्या मते, आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमद्वारे आपण पैसे काढणे, खात्यात पैसे जमा करणे, शिल्लक चौकशी, आधार ते आधार बँक हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट आणि बेस्ट फिंगर डिटेक्शन या सुविधांचा लाभ घेऊ शकता.