चीनपेक्षा 100 पटीनं लोकसंख्या कमी असलेला देश, ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या संख्येत मात्र पुढंं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीमुळे आतापर्यंत जगात २ लाख २७ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. ज्या चीनमधून कोरोना विषाणूची सुरुवात झाली, तिथे जितके मृत्यू झाले, त्याच्या तुलनेत १०० पट कमी लोकसंख्या असलेल्या लहान देशात जास्त मृत्यू झाले आहेत.

युरोपियन देश नेदरलँड्समध्ये भारतीय वेळेनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजून ५६ मिनटापर्यंत ४,७११ मृत्यू झाले असून चीनमध्ये ४,६३३ मृत्यू झाले आहेत.

नेदरलँडचे क्षेत्रफळ ४१,८६५ चौरस किलोमीटर आहे तर चीनचे क्षेत्रफळ ९५,९६,९६१ चौरस किलोमीटर आहे. क्षेत्राच्या दृष्टीने नेदरलँड्स चीनपेक्षा २२९ पटीने लहान आहे. नेदरलँड्सची राजधानी ऍम्सटरडॅम आहे. नेदरलँड्समधील हेग या शहरात आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, जेथे जगातील वादग्रस्त खटल्यांचे निकाल लागतात.

त्याचबरोबर लोकसंख्येच्या बाबतीतही नेदरलँड्सची लोकसंख्या चीनपेक्षा खूपच कमी आहे. नेदरलँडमधील २०१९ च्या जनगणनेनुसार सुमारे १ कोटी ७४ लाख लोकसंख्या आहे, तर चीनची लोकसंख्या सन २०१८ च्या अंदाजे लोकसंख्येनुसार १ अब्ज ४२ कोटींपेक्षा जास्त आहे. नेदरलँड्सची लोकसंख्या चीनपेक्षा १०० पटीने कमी आहे.

१७ ते २० व्या शतकापर्यंत जगातील बर्‍याच देशांवर नेदरलँड्सचे राज्य असताना त्याला हॉलंड म्हणून ओळखले जात असे. इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच हॉलंडची कंपनीही शक्तिशाली होती, जिने एकेकाळी दक्षिण पूर्व आशियाई देशांवर एकतर्फी राज्य केले होते.

युरोपियन देश बेल्जियममध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ७,५०१ मृत्यू झाले असून संक्रमित रूग्णांची संख्या ४७,८५९ पर्यंत पोहोचली आहे. हा देश आकाराने चीनपेक्षा ३१२ पटीने लहान आहे आणि एकेकाळी तो हॉलंडच्या देशाचा एक भाग राहिला आहे.

नेदरलँड्समधील कोरोनामुळे मृत्यूंची संख्या चीनपेक्षा जास्त झाल्यानंतर आता असे १० देश आहेत जिथे चीनपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.

यात सर्वात जास्त अमेरिकेत ६१,६६९ मृत्यू झाले आहेत. यांनतर इटली २७,६८२, युके २६,०९७, स्पेन २४,२७५, फ्रान्स २४,०८७, बेल्जीयम ७,५०१, जर्मनी ६,४६७, इराण ५,९५७, ब्राझील ५,५१३ आणि नेदरलँड्स ४,७११ आहे. तर चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ४,६३३ मृत्यू झाले आहेत.